आपल्याला कॅन्सर म्हटलं की साधारणपणे एकच विचार येतो हा आजार म्हणजे वय झाल्यानंतर होणारी समस्या. त्यामुळे तरुण वयात शरीरात एखादा त्रास जाणवला तर अनेकदा आपण त्याकडे फारसं गांभीर्याने पाहत नाही.
“गॅस असेल”, “थकवा असेल”, “जास्त कामामुळे झालं असेल”, “काही दिवसांनी ठीक होईल…” असं म्हणत आपण अनेक लक्षणांकडे दुर्लक्ष करतो.पण प्रत्येक लक्षण म्हणजे कॅन्सर नसला, तरी काही असामान्य बदल सतत होत असतील तर त्यांची तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे. कॅन्सरची अनेक लक्षणे इतर सामान्य आजारांमुळेही होऊ शकतात. मात्र एखादा त्रास काही आठवडे टिकत असेल किंवा वाढत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरते.
कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे कोणती?
कॅन्सर शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये होऊ शकतो आणि त्याची लक्षणेही कॅन्सरच्या प्रकारानुसार बदलतात. तरीही काही Cancer Warning Signs अशा आहेत, ज्यांकडे दुर्लक्ष करू नये.
1. शरीरावर नवीन गाठ किंवा सूज
मान, काख, स्तन, पोट किंवा शरीराच्या इतर कोणत्याही भागात नवीन गाठ किंवा सतत राहणारी सूज जाणवत असेल तर ती डॉक्टरांकडून तपासून घेणे आवश्यक आहे.
प्रत्येक गाठ कॅन्सरचीच असते असे नाही. पण स्वतःहून निष्कर्ष काढण्यापेक्षा वैद्यकीय तपासणी महत्त्वाची आहे.
2. अचानक आणि कारण नसताना वजन कमी होणे
डाएट किंवा व्यायामात कोणताही विशेष बदल न करता अचानक वजन कमी होत असेल, भूक कमी झाली असेल किंवा सतत अशक्तपणा जाणवत असेल तर त्यामागचे कारण शोधणे गरजेचे आहे.
हे कॅन्सरव्यतिरिक्त अनेक कारणांमुळे होऊ शकते; त्यामुळे घाबरण्यापेक्षा तपासणी करणे महत्त्वाचे.
3. सततचा खोकला किंवा आवाजात बदल
खोकला अनेक सामान्य कारणांमुळे होतो. मात्र खोकला दीर्घकाळ टिकत असेल, आवाज सतत बसत असेल किंवा खोकल्यातून रक्त येत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
4. शरीरातून असामान्य रक्तस्राव
लघवीत किंवा शौचात रक्त येणे, अनपेक्षित रक्तस्राव होणे किंवा इतर कोणताही असामान्य discharge जाणवणे हे दुर्लक्षित करण्यासारखे नाही.अशा लक्षणांची अनेक कारणे असू शकतात, पण योग्य कारण समजण्यासाठी वैद्यकीय तपासणी आवश्यक आहे.
5. सतत अपचन किंवा गिळताना त्रास
आपल्यापैकी अनेक जण अपचन, अॅसिडिटी किंवा छातीत जळजळ याकडे सहज दुर्लक्ष करतात. पण हा त्रास वारंवार होत असेल, बराच काळ टिकत असेल किंवा गिळताना त्रास होत असेल तर त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
6. जखम बरी न होणे
शरीरावरची एखादी जखम किंवा तोंडातील ulcer बराच काळ बरा होत नसेल, वारंवार रक्त येत असेल किंवा त्यामध्ये बदल होत असेल तर डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी.
7. शौच किंवा लघवीच्या सवयींमध्ये अचानक बदल
अचानक आणि सतत बद्धकोष्ठता, जुलाब, शौचाच्या सवयींमध्ये बदल किंवा लघवीच्या सवयींमध्ये बदल जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
पण यातही एक गोष्ट लक्षात ठेवा…
वरीलपैकी कोणतेही एक लक्षण दिसले म्हणजे कॅन्सर झाला आहे, असा अर्थ अजिबात होत नाही.
ही लक्षणे अनेक सामान्य आजारांमध्येही दिसू शकतात. त्यामुळे इंटरनेटवर symptoms शोधून स्वतःच diagnosis करण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घेणे हा योग्य मार्ग आहे.
येथे मुद्दा घाबरण्याचा नाही; वेळीच जागरूक होण्याचा आहे.
तरुणांनी काय काळजी घ्यावी?
कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी तंबाखू आणि धूम्रपान टाळणे, मद्यपान कमी/टाळणे, नियमित शारीरिक हालचाल करणे, वजन नियंत्रणात ठेवणे आणि संतुलित आहार घेणे महत्त्वाचे आहे. काही कॅन्सरशी HPV आणि Hepatitis B सारख्या संसर्गांचाही संबंध आहे आणि योग्य परिस्थितीत लसीकरण प्रतिबंधामध्ये भूमिका बजावू शकते.
आजच्या धावपळीच्या जीवनात आपण शरीराला वेळ देत नाही. डोकेदुखी, थकवा, अपचन, गाठ, रक्तस्राव किंवा वजनातील बदल यांना प्रत्येक वेळी “काही नाही” म्हणून सोडून देणे योग्य नाही.
शरीर काहीतरी सांगत असेल, तर ते ऐकायला शिकूया.
कारण कॅन्सरबाबत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भीती नाही तर जागरूकता, वेळेवर तपासणी आणि योग्य उपचार.
WHO नुसार अनेक कॅन्सरचे लवकर निदान आणि योग्य उपचार झाल्यास उपचाराला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता वाढते.
एक लक्षण दिसलं म्हणून घाबरू नका.पण एखादा बदल सतत जाणवत असेल तर दुर्लक्षही करू नका.
आजची छोटीशी जागरूकता उद्याचा मोठा धोका टाळू शकते.
टीप: हा लेख जनजागृतीसाठी आहे. वरील लक्षणे कॅन्सरसाठी विशिष्ट नाहीत. कोणताही त्रास सतत जाणवत असल्यास qualified doctor/oncologist यांचा वैद्यकीय सल्ला घ्या.
– क्रांती शेलार, नाशिक












