अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी २९ सप्टेंबरला मुंबईत महामोर्चा
सातारा : अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी मंगळवार, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबईतील आझाद मैदानावर मातंग समाजाच्या वतीने सामाजिक न्याय महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या महामोर्चात सहभागी होण्यासाठी सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून हजारो समाजबांधव मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत.
फलटण, कराड, माण, खटाव, कोरेगाव, महाबळेश्वर, वाई-पाचगणी, सातारा यांसह जिल्ह्यातील विविध भागांतून मोठ्या संख्येने मातंग समाजबांधव महामोर्चात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करून आरक्षणाचा लाभ वंचित घटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवावा, ही या आंदोलनाची प्रमुख मागणी आहे. आरक्षणातील लाभाचे समान वाटप व्हावे आणि सामाजिक न्यायाच्या दृष्टीने वंचित घटकांना न्याय मिळावा, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे.
या महामोर्चाला राज्यभरातून मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित राहण्याची शक्यता असून, दहा लाखांपर्यंत समाजबांधव सहभागी होण्याचा आयोजकांकडून दावा करण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईतील हा महामोर्चा राज्यातील महत्त्वाचे सामाजिक आंदोलन ठरण्याची शक्यता आहे.
अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा प्रश्न सध्या राज्याच्या सामाजिक व राजकीय पटलावर चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर मातंग समाजाकडून सरकारकडे उपवर्गीकरणाबाबत ठोस निर्णय घेण्याची मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, सातारा जिल्ह्यातून मोठ्या संख्येने समाजबांधव मुंबईत दाखल होणार असल्याने २९ सप्टेंबरच्या महामोर्चात सातारा जिल्ह्याची मोठी उपस्थिती पाहायला मिळणार आहे. आता सरकार या मागणीवर कोणती भूमिका घेते, याकडे समाजाचे लक्ष लागले आहे.
सातारा जिल्ह्यातून हजारो मातंग समाजासह इतर घटक समाजातील बांधव मुंबईच्या सामाजिक न्याय महामोर्चात सहभागी होणार
By Team LBNN
On: September 28, 2026 6:39 PM












