फलटण : सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाने 1 ऑगस्ट 2024 रोजी अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय देत राज्यांना अनुसूचित जातींच्या आरक्षणात उपवर्गीकरण करण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले. या निर्णयाची महाराष्ट्रात अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी मातंग समाजासह विविध घटकांकडून उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ भूमिका मांडली जात आहे.
महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांत तसेच वेगवेगळ्या सामाजिक संघटनांमध्ये आणि विविध विचारधारांसोबत काम करणारे समाजातील अनेक कार्यकर्ते या मुद्द्यावर एकवटत असल्याचे चित्र आहे. अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाला काही घटकांकडून विरोध होत असला, तरी मातंग समाज समान न्याय आणि समान हक्काच्या मागणीसाठी आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्यात यावे, या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगण्यात येत आहे.
येत्या 29 सप्टेंबर 2026 रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात येणाऱ्या मोर्चात महाराष्ट्रातील मातंग समाज मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर 20 सप्टेंबर 2026 रोजी कोळकी, ता. फलटण येथील शासकीय विश्रामगृहात सकल मातंग समाज फलटण तालुक्याच्या वतीने तालुकास्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत आरक्षण उपवर्गीकरणासह समाजाशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती सकल मातंग समाज, फलटण तालुका यांच्या वतीने देण्यात आली.
बैठकीस समाजातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मातंग समाज आरक्षण उपवर्गीकरणावर ठाम; फलटणमध्ये 20 सप्टेंबरला तालुकास्तरीय बैठक
By Team LBNN
On: September 15, 2026 7:26 PM












