सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

१९८० Trend”: आपण खरंच भूतकाळात परत जायला लागलो आहोत का? इतके एकटे पडलो आहोत का आपण या आधुनिक जगात

On: September 12, 2026 8:24 AM
Follow Us:

आजकाल सोशल मीडियावर एक मोठा ट्रेंड सुरू आहे…
“1980 Trend.”
एखाद्या फोटोला जुन्या काळाचा लूक देणं, त्या काळातील कपडे, घरं, रस्ते, नाती, जीवनशैली पुन्हा तयार करणं…
आणि बघता बघता हजारो-लाखो लोक या ट्रेंडमध्ये सहभागी होत आहेत.वरकरणी पाहिलं तर हा फक्त एक Social Media Trend वाटतो.थोडा फावला वेळ मिळाला, एक फोटो तयार केला, जुन्या काळाची आठवण करून घेतली आणि पुन्हा आपल्या नेहमीच्या आयुष्यात परतलो…पण खरंच एवढंच आहे का?
की या ट्रेंडच्या मागे आपल्या मनात दडलेली एक खोल इच्छा आहे?
आजच्या जगापेक्षा आपल्याला कालचं जग जास्त आपलंसं वाटू लागलं आहे का?
१९८० च्या काळात इंटरनेट नव्हतं.स्मार्टफोन नव्हते.Social Media चा मागमुसही नव्ह्ता.
प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात कैद करण्याची गरज नव्हती.
“Online” आणि “Offline” अशी आयुष्याची दोन वेगळी रूपं नव्हती.अशातच लोक भेटायचे.गप्पा मारायचे.
पत्र लिहायचे.एकमेकांच्या घरी सहज जायचे.शेजारी कोण राहतो हे माहीत असायचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे…
माणसांकडे माणसांसाठी वेळ होता.
आज आपल्याकडे संवादाची साधनं वाढली आहेत.
पण संवाद कमी झाला आहे.फ्लॅटमध्ये शेजारी कोण राहतं आपल्याला माहीत नसतं.तस बघितलं तर आपल्या मोबाईलमध्ये शेकडो Contacts असतील पण मन मोकळं करण्यासाठी आजकाल माणूसच नाही.आपल्याकडे हजारो Followers आहेत पण त्यातले आपलं दुःख खरंच समजून घेणारे किती? याचा विचार केला आहे?…
“काळ बदलला” तशी साधनं बदलली,जीवनशैली बदलली पण या सगळ्यात माणूस मात्र कुठेतरी स्वतःपासूनच दूर गेला आणि मग आलं २०१९ नंतरचं जग…फार दूर जाण्याची गरज नाही.२०१९ पासून आजपर्यंत जगाने जितके बदल पाहिले, ते कदाचित मागच्या अनेक वर्षांपेक्षा जास्त वेगाने आपल्या आयुष्यात आले.आणि त्यानंतर कोरोना महामारी,
Lockdown,Online शिक्षण,Digital payments,
Work From Home,Online meetings,
Social Media वर वाढलेला screentime,Artificial Intelligence,ChatGPT,Automation,Reels वगैरे वगैरे खुप काही आणि त्यातही सतत बदलत जाणारं हे Digital World.जग अक्षरशः आपल्या डोळ्यांसमोर बदलत गेलं आणि आपण?आपल्याला बदलायचंच होतं.
कारण बदल स्वीकारला नाही तर जगाच्या वेगाशी जुळवून घेणं कठीण होत होतं.
आज आपण एका क्लिकवर जगाच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या व्यक्तीशी बोलू शकतो.एका मिनिटात पैसे पाठवू शकतो.AI आपल्यासाठी माहिती शोधू शकतं.
मोबाईल आपलं Banking, Shopping, Education, Entertainment, Communication हे सगळं सांभाळतो.सगळं सोपं झालंय आता फक्त जमायला हवा तो मोबाईल हाताळणं पण तरीही एक प्रश्न आहे.आपलं आयुष्य खरंच इतकं सोपं झालंय का?
की फक्त आपल्या आयुष्याचा वेग वाढला आहे?
आज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत Notifications.
Messages.
Emails.
Calls.
Reels.
Deadlines.
Competition.
Career pressure.
Financial pressure.
Social comparison.
आणि दाटून येणारी उद्याची चिंता.आपण सतत काहीतरी धडपड करत असतो पण कधी विचारलं का स्वतःला
“यात मी स्वतःसाठी जगतोय तरी कधी?”…
यामुळेच कदाचित १९८० आपल्याला आकर्षित करतंय. आपल्याला त्या काळातील काळा-पांढरा किंवा Vintage फोटो नकोय.
आपल्याला हवा आहे तो निवांतपणा,ती साधेपणाची भावना,ती माणसांमधली जवळीक,तेच त्या काळातलं नात्यांमधलं नैसर्गिकपण आणि अशी सकाळ…
जिथे उठल्याबरोबर मोबाईल पाहण्याची गरज नसायची.
“जुन्या काळाची आठवण कदाचित काळाची नसते…
ती त्या काळात असलेल्या पण आज कुठेतरी हरवलेल्या आपल्या स्वतःच्या एका हरवलेल्या रूपाची असते.”
आजच्या तरुण पिढीने १९८० चा काळ कदाचित प्रत्यक्ष अनुभवलेलाही नाही तरीही त्या काळाच्या फोटोमध्ये, गाण्यांमध्ये, कपड्यांमध्ये आणि जीवनशैलीमध्ये त्यांना एक वेगळं आकर्षण वाटतं.
का?कारण Nostalgia ही फक्त आठवण नसते.
कधी कधी ती वर्तमानापासून काही क्षण दूर जाण्याची मानसिक गरज असते.
आणि त्याचमुळे आपण कदाचित भूतकाळाला Romanticize करतोय का अशी भावना सहज मनात डोकावते..
१९८० चं आयुष्य परिपूर्ण नव्हतं.त्या काळातही समस्या होत्या.तंत्रज्ञानाच्या सुविधा नव्हत्या.आरोग्यसेवा आजइतकी प्रगत नव्हती.करिअरच्या संधी मर्यादित होत्या.
स्त्रियांना अनेक सामाजिक बंधनांना सामोरं जावं लागायचं.
आज जी माहिती सहज क्लिकवर उपलब्ध होते ती तेव्हा नव्हती.परिपुर्ण जग नव्हतं (अर्थात आजही नाही आहे)पण
त्या काळात काही गोष्टी होत्या ज्या आजच्या आधुनिक जगात हळूहळू दुर्मिळ होत चालल्या आहेत.
वेळ.
संवाद.
साधेपणा.
शांतता.
प्रत्यक्ष नाती.
माणसामाणसांत रूजलेला आपलेपणा.
आणि म्हणूनच आपलं मन पुन्हा पुन्हा तिकडे वळतंय जे आजच्या आधुनिक जगात अपुर्ण आहे…
आज आपल्याकडे आठवणी साठवण्यासाठी Cloud आहे पण त्या आठवणी जगण्यासाठी मुळीच वेळ नाही.
हजारो फोटो आहेत पण फोटो काढताना फोन बाजूला ठेवून तो क्षण जगणं कमी झालंय.एखाद्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानासुद्धा आपण फक्त स्टेटस टाकतो पण फोनवर दोन शब्द किंवा मेसेज मध्ये भेट नसली‌ तर कसा/कशी आहेस हेच नेमकं विचारायला विसरतो..
“पूर्वी क्षण आठवणी बनायचे तेही मनापासून. आपल्या माणसांत त्याकाळी सोशल मिडियाची गरजही भासली नाही आणि त्यावेळेच्या लोकांना आज वाटतही नाही की फोटो हवे होते ,आपले व्हिडिओ हवे होते कारण त्यांनी ते क्षण जगलेले होते पण आज आठवणी बनवण्यासाठी क्षण, निमित्त,कॅमेरा शोधावे लागतात.”
आणि म्हणून 1980 Trend कदाचित एक आरसा आहे आपला आज आणि कालच्या बदलाचा..
आपण आज Technology मिळवली पण मनाची शांतता गमावली.आपण Connectivity मिळवली पण जवळीक गमावली आपल्या कोणाचाच आज कोणासोबत प्रत्यक्ष संपर्क नाही.रोज बोलणाऱ्या माणसाच्या वैयक्तिक आयुष्यात काय वादळ सुरू आहे हेही आपल्या ध्यानी नाही.
आपण अनेक पर्याय मिळवले आजच्या आधुनिक युगात
पण समाधान हरवलं आहे मनाचं..
आपण आत्ता इतक्या पुढे आलो आहोत ना आता परत मागे जायचं ठरवलं तरी ते शक्य होणार नाही.आपल्याला फक्त १९८० मधल्या काही गोष्टी आजच्या आयुष्यात परत आणायच्या आहेत. ज्या म्हणजे
थोडं कमी Online,थोडं जास्त Offline.
थोडं कमी Comparison,थोडं जास्त Contentment.
थोडं कमी Showing,थोडं जास्त Living.
थोडं कमी Notifications,थोडं जास्त Conversations.
शेवटी प्रगती म्हणजे फक्त नवीन तंत्रज्ञान स्वीकारणं आणि AI,AI चा गजर लावून २४तास कामालाच कवटाळून बसणं नव्हे. खरी प्रगती म्हणजे तंत्रज्ञान हातात असतानाही माणुसकी मनात टिकवणं.मोबाईल वापरत असतानाही समोरच्या माणसाकडे पाहून बोलणं.
AI वापरत असतानाही स्वतः तर्काने विचार करणं.
वेगाने धावत असतानाही कधीतरी थांबून श्वास घेणं.
आणि आधुनिक होत असतानाही आपल्याला माणूस बनवणाऱ्या गोष्टी न गमावणं….
हा ट्रेंड हेच शिकवत आहे की “१९८० Trend” हा भूतकाळात परत जाण्याचा ट्रेंड नसून आजच्या वेगवान जगात हरवलेल्या “साध्या आयुष्याचा” शोध आहे जो प्रत्येकजण काही क्षण जगु बघत आहे…..

– क्रांती शेलार, नाशिक

हे ही वाचा  'लोकशाही भारत न्यूज आद्य दीपोत्सव’ दिवाळी विशेषांक २०२६ साठी साहित्य पाठविण्याची आज आणि उद्या शेवटची संधी!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!