मुंबई : अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर धडाकेबाज कारवाईसाठी चर्चेत आलेले तुकाराम मुंढे यांनी पान मसाल्यांच्या कथित सरोगेट जाहिरातींप्रकरणी महत्त्वाचे भाष्य केले आहे. शाहरूख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना FDA कडून नोटीस बजावल्यानंतर मुंढे यांनी या प्रकरणातील कारवाईला उशीर झाल्याची चूक मान्य केली आहे.
पान मसाला ब्रँडच्या कथित सरोगेट जाहिरातींचे निरीक्षण व परीक्षण सुरू होते. मात्र, कारवाईला काहीसा विलंब झाला, असे मुंढे यांनी सांगितले. “उशिरा का होईना, पण योग्य कारवाई होणे महत्त्वाचे आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
सरोगेट तसेच दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर कायद्यानुसार निर्बंध असल्याचेही मुंढे यांनी स्पष्ट केले. अशा प्रकारच्या जाहिराती करता येत नाहीत. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, FDA ने संबंधित कलाकारांकडून जाहिरात करारांच्या प्रती, मोहिमेची माहिती, मानधनाचा तपशील तसेच जाहिरातीपूर्वी करण्यात आलेल्या पडताळणीचे पुरावे मागितल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणात संबंधित सेलिब्रिटींवर आर्थिक दंडाची कारवाई होण्याची शक्यता असून, नियमांनुसार पुढील कठोर कारवाईही होऊ शकते. त्यामुळे FDA च्या पुढील भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
शाहरूख, अजय अडचणीत? तुकाराम मुंढेंचा कायदेशीर कारवाईचा इशारा
By Team LBNN
On: August 19, 2026 2:04 PM












